शैक्षणिक व्यवस्थेचे परिवर्तन
शिक्षणातून परिवर्तन होण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेचे परिवर्तन व्हायला पाहिजे.
संस्कृत शिकण्यात किती मुलांना रस असेल शंकाच आहे पण शाळेत तेही शिकवलं जातं. अगदीच संस्कृत अभ्यासक्रमात ठेवायचंच असेल तर इंग्लिश सोडून दुसऱ्याही फ्रेंच, जर्मन, जपानी अशा भाषा शाळेत शिकवल्या गेल्या पाहिजेत. संस्कृतचे अभ्यासक्रमात असलेले श्लोक अजूनही पाठ आहेत. त्याऐवजी जर तेव्हा मागणी असलेल्या फॉरेनच्या भाषा शैक्षणिक धोरणात समाविष्ट केल्या असत्या तर आता मुलांना जास्त संधी मिळाल्या असत्या. संस्कृतमध्ये करिअर करणारे खूप कमी आहेत त्यासाठी सबंध शाळेला ऐच्छिक का होईना पण 100 मार्कांचा पेपर असण्याला लॉजिक ते काय असू शकेल?
जग एवढं पुढे गेलंय पण आपल्या बेसिकमध्येच गडबड आहे. मुलांच्या मेंदूवर जोर द्यायचा अजिबात हेतू नाही. पण मुलं तेवढी सक्षम असताना आपण त्यांना ठराविक गोष्टींमध्ये अडकवून त्यांचेच पाय मागे खेचतोय असं वाटत नाही का? शैक्षणिक धोरणामध्ये प्रचंड मोठा बदल व्हायला हवा. अजून 10-20-30 वर्षांनी अमेरिका, जपान, चायना, रशिया टेक्नॉलॉजी मध्ये प्रचंड पुढे गेलेले दिसतील आणि त्याच वेळेला आपली मुलं बेसिक गरजाच अपुऱ्या पडतायत म्हणून मागे राहायला नकोत. नवीन पिढी जगात आणायला जास्त कष्ट नाही लागत पण त्या पिढीला व्यवस्थित शिक्षण आणि जगाची ओळख करून देणं आपलं काम आहे. म्हणून एवढ्यातच सरकारने, राजकारण्यांनी, अधिकाऱ्यांनी आणि आपणही लक्ष दिलं पाहिजे. काल परवाच इंजिनिअरिंग डिग्री मराठीमध्ये करून देण्याबद्दल बातमी आलेली. बीए बीकॉम तर आताही मराठीत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर टिकायचं असेल तर इंग्लिश शिवाय पर्याय नाही आणि महाराष्ट्र सोडला तर मराठीला कोणी विचारत पण नाही. कार्पोरेट मध्ये मराठीला किती व्हॅल्यू आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे ही असली धोरणं विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक आहेत.
शैक्षणिक धोरणांमध्ये बदल आणि आपलं जाळ उभं करणं हे आताच्या घडीला महत्वाचे मुद्दे आहेत. खेड्यातल्या मुलांना जगाची ओळख होणं खूप जास्त गरजेचं आहे. गुणवत्ता, बुद्धिमत्ता तिथेही आहेच पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाहीये. चांगलं शिक्षण, आरोग्य मुलांचा हक्क आहे आणि तो मिळवून द्यायला आपण आता झटलं पाहिजे. आपापसातले मतभेद बाजूला ठेऊन विधायक कृती केल्या तर आपल्यालाच फायदा होईल. राजकीय मतभेद असतील पण समाजाचं भले कायम आपल्या अग्रस्थानी असेल यात मुळीच शंका नाही. बऱ्याच गोष्टी आहेत, कुठूनतरी सुरुवात करूया.